जगन्नाथ पण्डितकृता पीयूषलहरी / गङ्गालहरी (विश्लेषण)

 

जगन्नाथ पण्डितकृता पीयूषलहरी / गङ्गालहरी (विश्लेषण)


                  
पेरुभट्ट आणि लक्ष्मी ह्या अत्यंत विद्वान तेलंगी ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्मलेला जगन्नाथराय हा मुलगा गङ्गालहरी ह्या काव्याचा कवी. वडिलांनाच महागुरू मानून त्यांच्याकडूनच जगन्नाथाने विद्या संपादन केली. (त्यांच्या रसगंगाधर ह्या ग्रंथात वडिलांचा महागुरू असा उल्लेख आहे.) जगाला दीपविणारी विद्वत्ता, उत्तम शरीरसंपदा आणि तारुण्य असलेल्या ह्या सरस्वतीच्या पुत्रावर लक्ष्मीची कृपादृष्टी नव्हती. अर्थातच त्याच्या महत्वाकांक्षी मनाला स्वस्थ बसणे मानवले नाही. त्याने सरळ दिल्लीची वाट धरली.

             मोगल साम्राज्यात शहाजहानच्या पदरी तो स्थिरावला. बादशहाची मुलगी लवंगिका ह्या तडफदार कवीवर भाळली होती. एक दिवस बादशहा शहाजहान आणि जगन्नाथ पंडित बसलेले असतांना अचानक लवंगिका तेथे आली. बादशहाने ह्या शीघ्रकवीला स्वतःच्या मुलीवरच त्याक्षणी काव्य करुन दाखवायची आज्ञा केली. जगन्नाथ पंडिताची रसवंती पाझरु लागली. त्याने केलेले ते उत्तम काव्य ऐकल्यावर प्रसन्न झालेल्या बादशहाने त्याला `काय पाहिजे ते माग' असं सांगितले आणि जगन्नाथ पंडिताने लवंगिकेचीच मागणी केली. एक तर जगन्नाथ पंडिताचं वय लवंगिकेपेक्षा बरच जास्त होतं आणि तो काफर होता. पण-- नाईलाजाने बादशहाला त्याची मागणी पूर्ण करायला लागली. बादशहाने जगन्नाथ पंडिताला घर,सम्पत्ती जहागिरीही दिली.

पण  एका यवन कन्येबरोबरचा तो विवाह हिंदू आणि मुसलमान दोन्ही पक्षांना सारखाच अमान्य होता. औरंगजेब राज्यावर  आल्या आल्या त्याने  जगन्नाथ पंडिताची जहागिरी, संपत्ती जप्त केली. दोन्ही समाजाने वाळीत टाकलेला  जगन्नाथ पंडित उघड्यावर पडला. त्याला गंगामातेच्या किनार्‍याशिवाय कोणाचाच आधार उरला नव्हता. एक दिवस पहाटे लवंगिकेच्या उरलेल्या एकमेव वस्त्रावर स्वतःच्याही शरीराची लाज झाकत लवंगिकेजवळ गंगेच्या घाटावर झोपलेल्या जगन्नाथ पंडिताकडे अप्पय्या दीक्षितांची नजर गेली. अप्पय्या दीक्षित  ह्या व्याकरण पंडितांने आधीही हा कसला कवी?’ म्हणून जगन्नाथ पंडितांची वारंवार अवहेलना केली होती. आता तर दयनीय अवस्थेत झोपलेल्या जगन्नाथाला पाहून   प्पय्या दीक्षित खवचटपणे म्हणाले,--

‘‘किं निःश्शङ्कं शेषे शेषे वयसि त्वमागते मृत्यौ।

अथवा सुखं शयीथाः निकटे जागर्ति जाह्नवी भवतः।।’’

 ‘‘अरे, मृत्यू जवळ आल्यावर जीवनाच्या अंतिम समयी सुद्धा काही लाज लज्जा न बाळगता कोडग्यासारखा झोपतोस तरी कसा?’’  निर्धन झालेल्या जगन्नाथ पंडिताला हिणवत परत तो म्हणला,झोप बाबा सुखाने झोप. तू झोपलास तरी तुझ्याजवळ गंगा तर सतत जागी आहे.’’ सर्व ऐश्वर्य तर कधीच निघून गेलं आहे. गंगेच्या घाटाशिवाय तुला रहायला जागा तरी कुठे आहे? गंगेशवाय तुला कोणाचा आसरा नाही. हे जणू त्याचे ळजळीत शब्द सूचित करत होते. अप्पय्याच्या वाग्बाणाने विद्ध झालेल्या जगन्नाथाने अत्यंत शांतपणे त्यांच्याकडे पाहिले आणि गंगेकडे दृष्टिक्षेप टाकला. मनात उचंबळून आलेल्या सर्व भावना गंगेच्या स्तुतीपर एका एका श्लोकातून उत्स्फूर्त पणे त्यांच्या मुखातून बाहेर पडू लागल्या. ‘‘गंगे! हे गंगा मैय्या!! आता मला तुझ्याशिवाय कोणी नाही.’’ अशा अनन्य भावाने जगन्नाथाच्या मुखातून गंगालहरीचे एक एक श्लोक बाहेर पडत होता. तीच ही गंगालहरी. जगन्नाथ पंडित आपल्या काव्याला  पियूषलहरी म्हणतात.

असे म्हणतात, त्याच्या प्रत्येक श्लोकागणिक गंगा एक एक पायरी वरती चढत आली आणि शेवटच्या श्लोकाला जगाने दूर लोटलेल्या ह्या आपल्या पुत्राला लवंगिकेसह तिने आपल्या पोटात घेतलं. दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा’ म्हणजे मी दिल्लीश्वराच्या पायी तरी राहीन किंवा जगदीश्वराच्या तरी पायी लीन होईन असे म्हणणारा हा महाकवी संस्कृत साहित्याला मोलाचे योगदान देऊन गंगेत विलीन झाला.  

               52 श्लोकांचे हे गंगालहरी स्तोत्र साहित्याचा एक उत्तम नमुना आहे. प्रत्येक श्लोक एकापेक्षा एक वरचढ आहे.  येणार्‍या गंगादशहराच्या निमित्ताने ह्या अनुपम स्तोत्राचा आस्वाद आपल्याला मराठीतही घेता यावा म्हणून  गंगालहरींना मराठीत भावानुवादित करुन आपल्यासारख्या रसिकांसमोर ठेवतांना मला आनंद होत आहे. ह्या गंगालहरी वाचतांना आपल्या मनात आनंदलहरी निर्माण करतील अशी आशा आहे.

--------------------------------------

हे नीरगात्री गंगे, तू उताराकडे वहात जाणारी निम्नगा! पण हे माय, तुझ्या भक्तांना मात्र तू बोट धरून वैराग्याची एक एक पायरी चढवत नेतेस आणि स्वतः स्वर्गापर्यंत पोचणारा स्वर्गसोपान होतेस. माय, जगाने झिडकारलेल्या तुझ्या निःसीम भक्ताला जगन्नाथ पंडिताला लवंगिकेसह लेकरांप्रमाणे तू कायमचं तुझ्या कुशीत घेतलस. त्याच्या पीयूष लहरींच्या अमृतस्पर्शाने जगन्नाथ आजही अमर झाला. जगन्नाथ पंडिताचा ‘‘प्राणप्रयाणमहोत्सव’’ मी ‘गंगालहरीं’च्या साक्षीने अनुभवणार आहे. तुझ्या शांत गंभीर लहरींप्रमाणे हे ‘शिखरिणी’ वृत्त शब्दांना एकतारी प्रमाणे मंद सुरेल साथ देत राहील. त्याच्यासवे माझा मराठी भावानुवादाचा छोटासा दीप, तुझ्या प्रवाहात सोडत आहे. त्याला तुझ्या लहरींसवे डुलत डुलत पार करव.

गुणाढ्याने लिहीलेल्या बृहत्कथा ह्या विशाल ग्रंथांचे एक एक पान वाचून तो अग्नीत अर्पण करत गेला आणि अग्नी त्याला भस्मसात करत गेला. तुझे तसे नाही. तू सर्वांना तारून नेतेस. खवळलेला भवसागरही पार करवतेस; म्हणून, तुझ्या प्रवाहात सोडलेला भावार्थदीप लाटांसोबत जपून पुढे नेशील ह्या विश्वासाने तो तुला अर्पण करत आहे.

लहानपणीच माझ्या हाती गंगालहरीचा अनुवाद ठेवणार्‍या वामन पंडित , ल.गो. विंझे, द.कृ. पाध्ये ह्या पूर्वसुरींना नमन करून मी गंगालहरीचा भावानुवाद काव्यात सांगत आहे. 

------------------------------------

श्लोक 1

हे गंगा मैय्या तुझ्या ह्या निर्मल जलाचा महिमा मी काय वर्णन करू? तुझ्या जलाचा अमल विमलपणा, तुझ्या विपुल जलौघाचा विशाल विस्तार, तुझ्या (जलामधे असलेल्या विशिष्ट द्रव्यांमुळे आणि विशेष अशा सूक्ष्म जीवांमुळे) तुझ्या जलाचा ताजेपणा कायमचा टिकून राहण्याचे सामर्थ्य--- सर्वच अलौकिक आहे. तुझे गंगा जल हेच तुझे स्वयंसिद्ध ऐश्वर्य आहे. शिव, विष्णु वा कोणत्या देवाने तुला ते उदारहस्ते बहाल केलेले नाही तर, ते तुझे अंगभूत ऐश्वर्य आहे. तुला सर्वोच्च पदी विराजमान करणारं तुझं हे ईशित्व, योग्यता, सामर्थ्य, सम्पन्नता निरिच्छता, दुसर्‍याला उदारहस्ते ऐश्वर्य प्रदान करण्याचा मोठेपणा, तुझी दीन दुःखितांविषयी असलेली करुणा, प्रेम ह्या सर्व गुणांमुळेच तर भगिरथाने तुला भूतलावर आणलं. आणि तूही सर्व सगर पुत्रांचा उद्धार केलास.  जगन्नाथ पंडित म्हणतात,

 

‘‘हे गंगामाते, ही वसुंधरा सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने सम्पन्न असली तरी, वसुंधरेचा खराखुरा अमूल्य ठेवा, वर्णनही करता येणार नाही अशी सम्पन्नता, अनिर्वचनीय ऐश्वर्य हे दुसरं काही नसून गंगामाते तू आहेस. तुझा निरंतर वाहणारा हा प्रवाह, हे तुझे निर्मल गंगाजल आहे.

ज्याप्रमाणे अलंकारांनी नटलेल्या लावण्यवतीला माथ्यावरचा सौभाग्याचा कुंकुमतिलक विशेष शोभून दिसतो त्याप्रमाणे ह्या वसुंधरेवर सौभाग्याचा तिलक लावल्याप्रमाणे तुझं गंगाजल मनोरम आहे. हे गंगा जल ह्या वसुधेचं सौभाग्य आहे.

तुझ्या प्रवाहात कधी जलाची कमतरता नसते. तुझा विशाल जलप्रवाह जलानी समृद्ध असतो. तुझं जल अनेक गुणांनी समृद्ध आहे. ते अमृताप्रमाणे मधुर आहे. इतर सर्वसाधारण पाण्याप्रमाणे ते कधी खराब होत नाही,(इतर पाण्यात नसणारे बॅक्टेरिओफेज नावाचे उपयोगी बॅक्टेरिया  तझ्या पाण्यातील बाकी विषाणुंना खाऊन टाकतात. तुझ्या पाण्यात असलेलं सूक्ष्म गंधकाचं प्रमाण आणि ऑक्सिजनचा असलेला एक विशेष प्रकार तुझं पाणी स्वच्छ ठेवतो.)

माय, बाळाच्या मुखातून निघालेल्या सुभाषिताने जशी आईचा सुसंस्कृपणा कळतो तशी तुझ्या तीरावरील समृद्धी पाहून तुझ्या जलाच्या महान ऐश्वर्याचा अंदाज सहज करता येतो. तुझ्या समृद्ध जलाची परीक्षा तुझ्या तीरावरची समृद्धी पाहून होते. तुझे किनारे सुजल असल्याने धनधान्य, तरुलता, वनश्री, पक्षी, प्राणी आणि मानव संस्कृतीं हयांची कायम भरभराट करत राहतात. हे भगवती गंगे, समग्र ऐश्वर्य, समग्र धर्म, समग्र यश, समग्र श्री, पूर्ण ज्ञान, पूर्ण वैराग्य ह्या सहांच्या समुच्चयाला भग म्हणतात. हे परम ऐश्वर्य तुझ्यापाशी असल्यानेच तुला भगवती संबोधलं जातं.

आद्य शंकराचार्य तुझं वर्णन करताना म्हणतात,

त्रैलोक्याचे असे तू, त्रिभुवनजननी सार सामर्थ्य,शक्ती ।

येई ना या जलाची, लवभर सरही ,वस्तुसी कोणत्याही ।।

 

बलाढ्य असो वा अक्राळविक्राळ भीषण समस्या; त्याचं निरसन करण्यासाठी शिव सतत सज्ज आहे. त्याचा पाडाव करण्यास शिव समर्थ आहे. नित्य शस्त्रसज्ज आहे. त्यासाठीच त्याने हातात कायम परशू धारण केला आहे. म्हणूनच शिवाला खंडपरशू म्हणतात. तो देवांचाही देव महादेव जणु काही त्याच्या डाव्या हाताचा मळ असावा इतक्या सहजगत्या हे 14 भुवनांचं सर्व विश्व निर्माण करतो. ज्या महादेवाच्या पायाशी सर्व प्रकारचं अद्भुत ऐश्वर्य लोळण घेतं त्या महादेवालाही त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेमधे महान ऐश्वर्ययुक्त असं गंगाजल अद्वितीय वाटत असावं म्हणूनच त्याने ते त्याच्या माथ्यावर धारण केलं आहे.

चांगल्या मनाच्या लोकांना सुमन म्हणतात. देवांनाही सुमन किंवा सुर म्हणतात.(सुष्ठ राति - सुष्ठु म्हणजे जनहिताचं, कल्याणकारी. राति म्हणजे देतात ते सुर!  ) देव कायम लोकांच्या हिताची कामं करतात. म्हणुनच त्यांना सुर म्हणतात. देव जी काही सत्कृत्य करतात, लोकांच्या हिताचं काम करतात, त्याचं दृश्य स्वरूप, कृतीचा परिपाक/परिणाम म्हणजे तूच आहेस. कारण जगाच्या हितासाठी झटण्यापलिकडे तू काही जाणत नाहीस. 

तुझा हा विशाल प्रवाह कायम सर्व भूतमात्रांचं कल्याण करण्यासाठीच वाहत असतो. माय, वेद तरी वेगळं काय सांगतात गं? ‘‘ विमोह टाकुन कर्मफळाचा सिद्ध होई पार्था । कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था’’ हेच तर सांगतात ना? तुझं नावच गंगा! गंगा म्हणजे कायम पुढे पुढे जाणारी. मागे वळूनही पहात नाहीस. दोन्ही किनार्‍यांना समृद्धीचं भरभरून दान देऊनही तुझ्या निरिच्छ मनाला कुठल्याही फळाची आशा नाही.

पतित-पावना हे जननी मम। परोपकारास्तव तव जीवन

तुझ्या तिरावर राहती त्यांचे। कौतुक पुरविसी कल्पलतेसम

 चारही वेदांची शिकवण सत्यात आणणारा असा हा तुझा जलप्रवाह आहे. माय, तुझ्या तीरावर विचारांनी समृद्ध असलेल्या संस्कृतिंचा उदय झाला. त्यांची भरभराट झाली; वेद हे त्याचंच फलित आहेत. ह्या वेदांचं सारं सर्वस्व तूच आहेस.

अमृताहून गोड असलेलं तुझं पाणी अनेक जीवांना जीवन देणारं आहे. अमृत मृतांना संजीवनी देतं. त्याप्रमाणे सर्व जीवसृष्टीला संजीवनी देण्याचं काम तू करतेस. जीवन प्रदान करतेस. त्यांना जगवतेस, फुलवतेस, समृद्ध करतेस. अमृत आणि अमृतासमान तुझं गोड पाणी ह्यात काही अंतर आहे असं मला वाटत नाही.

तसं पाहिलं तर ही सुधा आणि तुझी ही सुधाधारा दोघीही जणु जुळ्या बहिणी वाटाव्या इतकं तुमच्यात साम्य आहे. तुमच्या कृती सर्व जीव जंतूना उत्तम आयुष्य आरोग्य देतात. जीवन प्रदान करतात. तू समुद्राला मिळतेस तर सुधा ही सिंधूतच होती. समुद्रमंथनाच्यावेळी ती बाहेर आली. समुद्रातून बाहेर आलेला सुधांशु(चंद्र) हाही अमृत किरणं बरसवत असतो.  त्यामुळे सुधा, सुधांशु आणि गंगा तुम्ही एकमेकांची भावंडे आहात. सुधा आणि सुधांशु प्रमाणे शांत, शीतल, निस्वार्थपणे वाहणारा हा तुझा जलौघ हित, कल्याण, परोपकार करतच पुढे जातो.

केले विश्व पवित्र मंगलमयी पृथ्वीस आनंदवी

श्रद्धास्थानचि वाटते मम हृदी ऐसीच भागीरथी

नाशी पाप अमंगलास अवघ्या दुःखे करी दूर जी

माझे रक्षण ती करो; मम हिता पाहो सदा जाह्नवी।।

 

--------------------------------

 

(वृत्त- शिखरिणी  अक्षरे - 17, गण- य म न स भ ल ग , यति - 6, 11 )

समृद्धं सौभाग्यं सकलवसुधायाः किमपि तन्-

महैश्वर्यं लीलाजनितजगतः खण्डपरशोः।

श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां

सुधासोदर्यं* ते सलिलमशिवं नः शमयतु।।1

अन्वय -  भो गंगे, सकलवसुधायाः  किमपि समृद्धं सौभाग्यं , लीलाजनितजगतः खण्डपरशोः महैश्वर्यं, श्रुतीनां सर्वस्वं, सुमनसां मूर्तं सुकृतं, अथ सुधासोदर्यं तत् ते सलिलं , नः शमयतु (1)

 

(भो गङ्गे!) हे गंगे ते- तुझे  तत् – ते सलिलं- जलप्रवाह नः – आमच्या अशिवं – अपवित्र शमयतु – शमवो. नाश करो. यत् - जे   सकल वसुधायाः – संपूर्ण पृथ्वीचे किमपि – अनिर्वचनीय, अमूल्य समृद्धं - समपन्नता सौभाग्यं - , लीलाजनितजगतः – ज्याने विना सायास ही 14 जगे निर्माण केली आहेत तो  खण्डपरशोः – शत्रूचे खंडन/ नाश करणारा परशु ज्याच्या जवळ आहे असा शिव महैश्वर्यं- असीम सम्पत्ती श्रुतीनां - वेदांचे सर्वस्वं – संपूर्ण धन सर्वस्व, सुमनसां- पवित्र मनाच्या देवांचे मूर्तं -मूर्तिमंत सुकृतं - पुण्य सुधासौंदर्यं - अमृतासमान शोभा / सुधासोदर्यं – अमृताची बहीण असणं

(सुधासोदर्यम्सुधा म्हणजे अमृत हे समुद्रमंथनातून बाहेर आले तर गंगा समुद्रात विलीन होते. एकाच समुद्राच्या पोटी असलेल्या या जणु सख्या बहिणीच आहेत. त्यांचे गुण ही सारखेच आहेत. दोघीही कल्याणकारीच आहेत असा अर्थ अभिप्रेत आहे.  काही ठिकाणी सुधासौंदर्यम् असा पाठही आहे. अर्थात ह्याचाही अर्थ अमृताप्रमाणे सौंदर्य असलेली म्हणजेच कल्याणकारी असाच आहे. )    

खुले भाळी जैसा तिलक जणु लावण्यवतिसी

तसे गंगेचे हे सलिल नटवी ह्या अवनिसी ।

असे सौभाग्याचे प्रतिक जल हेची धरतिचे

असे गंगामाते तव सलिल ऐश्वर्य क्षितिचे ।। 1.1 ।।

 

सदा राहे तूची मधुर जलसम्पन्न सरिते

असे कल्याणाची सुखद पुतळी तूचि सरिते ।

जलौघाने  तू गे शमविसि  तृषा या धरणिची

तृषार्ता पृथ्वीला निवविसि जलानेच जननी ।।1.2 ।।

 

तुझ्या मार्गामध्ये उधळण सुखाचीच करिसी

सुधाधारा ह्या गे हरित अवनी ही फुलविती ।

फळांनी पुष्पांनी नटवि वसुधा तू सुरधुनी

महीची तृप्ती तू, बहु सुख समाधान असशी ।। 1.3।।

 

जयाच्या खड्गाने रिपु सकल ते दुष्ट वधिले

जगाची उत्पत्ती अति सहज ज्या खेळचि गमे

अगे शंभू तोची सलिल विभवा ह्या अनुपमा

बघोनी देई का शिवशिरि तुला स्थान नित का? ।। 1.4  ।।

 

असे हे वेदांचे उजळ अवघे पुण्य बरवे

असे वा देवांचे सुकृत नयना जे दिसतसे

तुझी धारा शुभ्रा स्फटिक धवला शुद्ध सरिते

सुधेची तू शोभे भगिनि दुसरी कल्पलतिके ।।1. 5 ।।

 

सुधेलाही जिंके मधुमधुर हेची जल तुझे

मृतालाही ज्याने अति सुखद संजीवनि मिळे

सदा चैतन्याने उसळत असे जे जल तुझे

अनर्थांसी सार्‍या नित शमवु दे माय मम गे ।।1.6 ।।

----------------------------------------

Comments